Sunday, January 19, 2014

राजा ललकारी अशी घे ... Raaja lalakari ashi ghe

शाळेत असताना बरीच मराठी गाणी ऐकली जायची. तसेही संगमनेर हे ग्रामीण आणि शहरी जीवनाचा संगम असलेले गाव होते त्यामुळे त्याकाळी आलेल्या "अरे संसार संसार" चित्रपटातील गाणी आवडीने सगळीकडे लावली जायची. एक सुंदर ग्रामीण चित्रपट आणि रंजना व कुलदीप पवार यांचा तितकाच सुंदर अभिनय.

या सुंदर अभिनयाला जोड होती अप्रतिम गाण्यांची. अनिल-अरुण यांनी ज्या चित्रपटांतील गाण्यांचे सोने केले त्यांमध्ये हा अग्रभागी असेल. जगदीश खेबुडकरांची रचना तुम्हाला त्या शेतावर घेऊन जाते. जरी ते गाणे तुमच्यासमोर नसले तरी ती ललकारी ऐकताना तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर नायिका गोफण फिरवताना दिसते. तसेच नायक नांगरताना आणि मोट वाहताना दिसतो. त्या गाण्यात आपले नायक नायिका या शिवाराबरोबर आमचे प्रेम पण फुलू देत असे म्हणतात. खेबुडकर यात शेतीचे  आपल्या जीवनपद्धतीमध्ये असलेले महत्व बरोबर पकडतात. आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातले जीवन हे शेती आणि पावसावर अवलंबून आहे. सगळे सणवार, आयुष्यातील महत्वाच्या घटना या शेतीशी निगडीत आहेत. खेबुडकरामधला कवी काळी माय आणि तिचे अनंत उपकार अतिशय सुंदरपणे व्यक्त करतो.

या अश्या सुरेख गाण्याला सुश्राव्य केले आहे ते अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजांनी. ती गाण्याच्या सुरवातीची ललकारी आणि त्यातील आपल्या नयकबद्दलचे प्रेम अनुराधा पौडवाल सुरेल पणे दाखवून देतात आणि त्यांचा कणखर प्रियकर अश्या कुलदीप पवारांना सुरेश वाडकरांचा आवाज चपखेल बसतो.

एक सुंदर सुश्राव्य गीत - दूरदर्शन वरील चित्रगीताची आठवण जागवणारे.

राजा ललकारी अशी घे
हाक दिली साद मला दे

कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंया
भरलेल्या मोटंवानी, मन भरून गेलंया
ओढ फुलाला वार्‍याची, जशी खूण इशार्‍याची
माझ्या सजनाला कळू दे

सूर भेटला सूराला, गानं आलं तालावर
खुळ्या आनंदाचं माझ्या, हासू तुझ्या गालावर
भरजरीचा हिरवा, शेला पांघरून नवा
शिवार हे सारं खुलू दे

थेंब नव्हं हे घामाचं, त्याचं बनतील मोती
घास देईल सुखाचा, लई मायाळू ही माती
न्याहारीच्या वखुताला, घडीभर इसाव्याला
सावली ही संग मिळू दे            

(धन्यवाद: आठवणीतील गाणी http://www.aathavanitli-gani.com/Song/Raja_Lalakari_Ashi_Ghe )