कालच आई म्हणाली आज रामनवमी आहे जरा नमस्कार कर तो चांगली बुद्धी देईल. आता आम्ही कधी तिचा सल्ला ऐकतो कधी नाही ऐकत पण आज काही तरी वेगळेच होते. चेहरे पुस्तकावर एक श्लोक वाचला आणि कळले की हे गीत रामायणातील राम जन्माचे गीत आहे. गीत रामायणातील काही गीते मधून मधून ऐकली होतीच पण निदान माझ्या पिढीला तरी गीत रामायण काय आहे हे कमीच माहिती आहे. ग दि मा आणि सुधीर फडक्यांनी रचलेली गीते आहेत एवढे माहिती होते. मग काय शोधाशोध सुरु झाली आणि हाती लागला खजिना. गीत रामायणाच्या सुवर्ण महोत्सवासाठी सकाळ ने आयोजित केलेल्या सुश्राव्य कार्यक्रमाचे चित्रीकरण तू-नळीवर सापडले. आणि मी ते ऐकण्यात हरवून गेलो.
१ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणीवर या महायज्ञाची सुरुवात झाली आणि एका वर्षानंतर एप्रिल १९५६ मध्ये शेवटचे गीत प्रसारित झाले. महाभारत आणि श्रीकृष्ण दूरदर्शन वर पाहिल्यामुळे दर आठवड्याला नवीन भाग पाहण्याची किंवा ऐकण्यातली जी हुरहूर सर्व घराला असते ती मी अनुभवली आहे. म्हणून फक्त कल्पना करू शकतो त्यावेळेस सर्वजण किती आतुरतेने नवीन भागाची वाट पाहत असतील. गीत रामायणाची कीर्ती इतकी वाढली की नंतर वर्तमानपत्रेही नवीन गीत दर आठवड्याला छापू लागली. ग दि मांची रसाळ भाषाशैली आणि बाबूजींचे श्रवणीय संगीत असा एक दैवी संग गीत रामायणात घडून आला. त्याचबरोबर गायला सुधीर फडके, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर आणि अजूनही बरच प्रथितयश गायक मिळाले.
गंध युक्त तरीही वाट उष्ण हे किती.
दोन प्रहरी का ग शिरी सुर्य थांबला …
राम जन्मला ग सखे …राम जन्मला
राम जन्माचे किती सुंदर वर्णन आहे यात. अशीच सुंदर संपूर्ण ५६ गाणी ग दि मांनी लिहिली. ज्यांनी खरच त्याकाळी आकाशवाणीवर ऐकले त्यांचा थोडा हेवा वाटतो आहे पण जे अटल बिहारी वाजपेई म्हणत होते "आपण सर्व तर या काळात विरून जाऊ पण गीत रामायण असेच वर्षानुवर्षे टवटवीत राहील". मला महिती नाही माझ्या पिढीतील आणि माझ्या नंतरच्या किती लोकांना हा सुंदर ठेवा माहिती आहे - म्हणून हा एक छोटा प्रयत्न पुनश्च ओळख करून देण्याचा.
बरोबर तू-नळी वरील चित्रीकरण देतो आहे. ते ऐकून आनंद घ्या हो आणि सुधीर फडक्यांच्या आवाजातले मूळ मिळाले तर अजूनच आनंद द्विगुणीत होईल.
(धन्यावाद - मिनल देवस्थळे)